मुरुडची कोटेश्वरी देवी

विशाल समुद्रकिनारा व नारळ आणि सुपारीच्या बागांनी बहरलेले असे रायगडमधील मुरुड हे गाव आहे. पूर्वी जंजिरा संस्थानाची मुरुड ही राजधानी होती. अशा या मुरुडमध्ये देवदेवतांची अनेक मंदिरं आहेत. या देवतांमध्ये मुरुडचे ग्रामदैवत असलेले कोटेश्वरी देवीचे देवस्थान आहे. मुरुड शहरात प्रवेश करतानाच वेशीवरच कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर अथांग सिंधुसागर दिसतो. मंदिराच्या पूर्वेला उंच डोंगरावर श्रीदत्त मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोटेश्वरी देवीची स्थापना कासा किल्ल्यात केली होती. नंतर ही देवी मुखवटय़ाच्या स्वरूपात मुरुडमध्ये प्रकट झाली. त्याच ठिकाणी त्यावेळी देवीचे छोटे मंदिर बांधण्यात आले. नंतरच्या काळात मंदिराचा जीर्णोद्वार केल्याने आता येथे भव्य मंदिर निर्माण झाले आहे. देवीच्या मूर्तीची गावाच्या वेशीवर म्हणजे कोटावर स्थापना करण्यात आल्याने तिला कोटेश्वरी, असे नाव मिळाले, अशी आख्यायिका आहे. या देवीची पूजा करण्याचा मान शहरातील गुरव घराण्याकडे आहे. साळकरी पद्धतीने गुरव देवीची यथासांग पूजा करतात व शारदीय नवरात्रोत्सव साजरा करत असतात. तत्कालीन जंजि-याचे नबाब सिद्धी अहमद खान यांनी भोगेश्वरी, कोटेश्वरी तसेच नांदगाव येथील सिद्धिविनायक मंदिरात नित्य पूजा व्हावी, दिवाबत्तीची सोय व्हावी म्हणून संस्थानच्या तिजोरीतून निधी देण्याची सोय केली होती. कोटेश्वरी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवात महिलांचे धार्मिक कार्यक्रम, सप्तपदीपाठ, नवचंडी होम आदी कार्यक्रम होत असतात. येथे केवळ मुरुडच नव्हे तर अन्य ठिकाणचे भाविकही मोठय़ा प्रमाणावर दर्शनासाठी येतात. कोटेश्वरी माता दांडेकर, कासार, वडके, खरवलीकर, निजामपूरकर आदींची कुलदेवता आहे.

चौल

ज्यांना इतिहासात डोकावयाचे आहे, धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या आहेत, समुद्र किना-यावर फेरफटका मारावयाचा आहे; त्यांच्यासाठी चौल हे शांत सुंदर स्थळ आहे. हे गर्द वृक्षराजीने वेढलेलं व नारळी फोफळीच्या बागांनी डवरलेलं ऐतिहासिक गाव आहे. ज्ञात इतिहासावरून इ. स. 130पासून 1786पर्यंत चौल ऐतिहासिक घटनांचं प्रमुख केंद्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रसिद्ध बंदर होतं. मराठय़ांच्या आरमार दलाचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कुलाबा किल्ल्या परिसरातील समुद्रकिना-यावरील आठ आगरे ‘अष्टागार’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ती म्हणजे सासवणे, आवास, किहीम, थळ, आक्षी, नागांव, रेवदंडा व चौल.

महालक्ष्मी, चंपावतीदेवी, काळभैरव, महाकाली, वाघजाईदेवी अशी अनेक जागृत देवस्थानं चौलमध्ये आहेत. देवदर्शनानंतर चौल किल्ला परिसरात भटकावं. या किल्ला परिसराला ‘राजकोट’ म्हटलं जातं. चौल हे व्यापारी बंदर असताना तेथे येणा-या व्यापारी आणि त्यांच्या लवाजामासाठी हमाम खान्याची सोय व मनोरंजन करण्यासाठी कलावंतीनीचा वाडा यांची निर्मिती केली होती. हा वाडा-दगड-चुना वापरून मुस्लिम पद्धतीनं बांधलेला आहे. त्याच्या दर्शनी बाजूस घडीव दगडांच्या तीन शिखर कमानी व तीन विटांच्या थरांचे  घुमट आहेत. मधोमध प्रशस्त पटांगण व शेजारी विस्तीर्ण तलाव आणि त्याला बिलगुन गोडय़ा पाण्याची विहीर आहे.येथल्या बुरुजावरून दक्षिण दिशेला असलेला बिर्ला गणेश मंदिराचा आणि साळावचा निसर्ग रम्य परिसर दिसतो. 1636-1646 मध्ये विजापूरकरांचा चौलवर ताबा असताना त्यांनी राजकोट बांधला असावा अश नंद आहे.चौल जवळच रेवदंडा बाजारपेठ, रेवदंडा किल्ला, समुद्र किनारा आहे. साळावचे गणेश मंदिर, कोरलाई किल्ला, बाग मांडले, मुरुड बिच व जंजिरा किल्ला असा विविधांगी इथं आहे. चौलला मुंबईच्या गेटवे वरून अलिबाग लाँचनं येता येते. पनवेलहून थेट चौल, रेवदंडा, मुरुडकडे जाणा-या गाडय़ा आहेत.